सोलापूर : बार्शी तालुक्यातील मालेगाव भागात 25-30 मोरांचा विषबाधेने मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून मोरांचे मृतदेह गावकऱ्यांना आढळून येत आहेत.

बार्शी शहरात राहणाऱ्या निसर्गप्रेमींना ही घटना कळताच, ते गावात दाखल झाले. त्यांनी केलेल्या पाहणीमध्ये मोरांना विष देऊन मारले असल्याचं समोर आले आहे.

गावातील काही लोकांनी मक्याला विष लावून मुद्दाम मोर मारले असल्याची चर्चा गावात आहे. मागील 3 दिवसांपासून गावात दररोज अनेक मोर आणि लांडोर मृतावस्थेत आढळत आहेत.

मोरांसह इतर पक्षीही मक्याचे  विषारी दाणे खाऊन मरुन पडले आहेत. तीतर, भारद्वाज, चिमण्या, कावळेही मरुन पडले आहेत.

घटनेची माहिती कळताच सोलापूर येथून वनविभागाचे कर्मचारी गावात दाखल झाले असून, वनविभागाचा प्राथमिक चौकशीत शिकारीच्या उद्देशाने मोरांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे.