मुंबई : मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) देऊ नये यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे काहीही झालं तरी मी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवून देणार, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरील अशा परिस्थितीमुळे राज्य सरकारची चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना थेट लक्ष्य केलंय. काहीही झालं तरी मी भुजबळ यांना सोडणार नाही. धनगर आणि मराठा समाजात ते वाद निर्माण करू पाहात आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. ते आज (22 जून) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.


...तर असा लढा पिढ्यानपिढ्या उभा राहणार नाही


"माझ्यावर टोकाची टीका झाली. तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयार आहे. मी यांना घाबरत नाही. फक्त मराठा समजाने माझ्या पाठीमागे उभे राहावे. राजकारणामुळे मला एकटं पडू देऊ नका. तसं झालं तर मराठ्यांचा असा लढा नंतर पिढ्यानपिढ्या उभा राहणार नाही. माझ्या जातीची शान वाढावी म्हणून मी भरपूर काही सोडून दिलं आहे. मी अजूनही झुंज देत आहे. त्यांनी मराठा जात खिंडीत पकडली आहे, अडचणीत आणली आहे," असे जरांगे म्हणाले. 


भुजबळ धनगर-मराठा समाजात वाद उभा करू पाहतायत- मनोज जरांगे


भुजबळ मराठा आणि धनगर समाजात वाद पेटवत आहेत, असे जरांगे म्हणाले. "काल सगळे ओबीसी नेते एकत्र आले होते. हे सगळंकाही आंदोलनकर्ते नव्हे तर छगन भुजबळ घडवून आणत आहेत. छगन भुजबळ द्वेष पेरत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर दबाव आणला आहे. छगन भुजबळ हे लोकांना द्वेषाने सांगत आहेत. मी छगन भुजबळ यांना सोडू शकत नाही. त्यांनीच ओबीसींचं आंदोलन चालू केलं आहे. आता ते धनगर आणि मराठा बांधवांमध्ये वाद उभा करत आहेत," अशा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच भुजबळ यांची सुटका नाही, असेही जरांगे म्हणाले.


आता कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. याला काय म्हणावे. येवल्याचे छगन भुजबळ जाहीरपणे म्हणाले की उपोषण करणारे माझे लोक आहेत. माझे पोरं आहेत. माझे फंटर आहेत. फंटर म्हणजे काय हे मला माहिती नाही. छगन भुजबळ यांना धनगर आणि मराठा यांच्यात भांडण लावायचे आहेत, असा दावाही जरांगे यांनी केला.


...तर माझं नाव बदलेन


दरम्यान, शुक्रवारीदेखील मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर आगपाखड केली होती. ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळच सगळे पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता.


हेही वाचा :


बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही, मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही : मनोज जरांगे


Laxman Hake OBC Reservation: सरकारी शिष्टमंडळ येण्यापूर्वी राजेश टोपे तडकाफडकी जालन्यात लक्ष्मण हाकेंच्या भेटीला, स्टेजवर फक्त 5 मिनिटं बसले अन्..


Chhagan Bhujbal: जरांगे म्हणाले तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करेन, छगन भुजबळ म्हणाले, मी हरलो तरी ओबीसींसाठी लढत राहीन