मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील अंतिम सुनावणी 19 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासंबंधी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने ती स्वीकारुन 19 सप्टेंबरला अंतिम सुनावणी ठेवली आहे.
सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या मराठा आरक्षण हायकोर्टात प्रलंबित आहे. त्याची तातडीने सुनावणी करुन 3 महिन्यात निकाली काढण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षात आरक्षणाचा फायदा मिळावा अशी विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे.
2014 साली महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक मागास असल्याचं सांगत 16 टक्के आरक्षण दिलं होतं. पण नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी दिलेल्या या आरक्षणावर हायकोर्टाने स्थगिती आणली होती.