मुंबई: मराठा आरक्षणांसंबंधी राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. संभाजीराजेंनी आपलं उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे त्यांना भेटण्यासाठी आझाद मैदानावर आले आहेत.
मराठा आरक्षणासंबंधी मागण्यासाठी खासदार संभाजीराजे गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी त्यांची भेटीला राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे भेटीला आले आहेत. त्यांच्यामध्ये व्यासपीठावरच बैठक सुरू असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे.
आज सकाळी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे, मात्र त्यांनी औषधं घ्यायला नकार दिला आहे. खासदार संभाजीराजेंच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे या देखील आझाद मैदानावर आहेत.
आपले उपोषण हे 30 टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून ते 70 टक्के गरीब मराठ्यांसाठी असल्याचं संभाजीराजेंनी या आधीच स्पष्ट केलं आहे. खासदार संभाजीराजे या उपोषणावर बोलताना म्हणाले होते की, "गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे. त्यामुळे 22 मागण्यांपैकी कमीत कमी 6 मागण्या राज्य सरकारने मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही. याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे. मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय."
संबंधित बातम्या: