औरंगाबाद : गोदावरी नदीत उडी मारलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. काकासाहेब शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबादमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक तरूणांनी गोदावरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना थोपवून धरलं.


काकासाहेब शिंदे तरुणानं नदीत उडी घेतली आणि तो बुडाला. काही वेळानंतर त्याला नदीबाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षाव्यवस्था प्रशासनाकडून केली नसल्याचं देखील समोर आलं आहे.


आंदोलक काकासाहेब याच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान आंदोलकांनी घटनास्थळीच रास्तारोको सुरु केला आहे. आंदोलकांनी औरंगाबाद-नगर रस्ता रोखून धरला आहे.


दरम्यान, घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, प्रशासनासह सर्व पक्षीय नेते आणि मराठा आंदोलक समन्वयकांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आणि टोकाचं पाऊन न उचलण्याचं आवाहन केलं आहे.


मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी
पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजीचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला. एका महिला कार्यकर्त्यांनं कार्यक्रम सुरु होत असताना मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिल्यानंतर हा प्रकार घडला. उपस्थित पोलिसांनी महिला आंदोलकाला ताब्यात घेतलं, त्याआधी 25 ते 30 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. पिंपरीतील क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्राहलायच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते.


मराठा आरक्षणासाठी ठिय्या
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. बीड जिल्ह्यातील परळीत 18 जुलैपासून या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर जागेवरुन हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.


'मेगा भरती रद्द करा'
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरुच आहे. जोवर ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही. अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.