शिर्डी : मराठा समाजाला आरक्षण देऊन बहिणीला भाऊबीजेची ओवाळणी द्या, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे यांनी केली आहे. आज आपल्या पतीसह भावाच्या घरासमोर झालेल्या सकल मराठा समाजच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या.


संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून केली जातेय. पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज गांधी जयंतीचं औचित्य साधत महाविकास आघाडातील मंत्री आणि नेते यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची हाक मराठा क्रांती मोर्चाने दिली होती.


त्या अनुषंघाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानासमोर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठिय्या आंदोलन प्रसंगी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे तसेच नाशिक पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांनीही ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.


जालन्यात दानवेंच्या बंगल्यासमोर थाळी नाद


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना इथल्या बंगल्यासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं थाळी नाद आंदोलन करण्यात आलं. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ठरल्यानुसार राज्यातील सर्व आमदार खासदारांच्या घरासमोसमोर आंदोलन करण्याचा निर्णय झाला आणि त्यानुसार जालन्यात दानवे यांच्या बंगल्यासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं थाळी नाद आंदोलन करण्यात आलं.

काय आहेत मागण्या
मराठा समाजाला ईडब्लूएसमध्ये आरक्षण देवू नये, स्थगिती उठे पर्यंत कुठल्याही विभागात भरती करू नये, कपर्डीतल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा अशा विविध मागण्यांसाठी मराठा समाजानं हे आंदोलन केलंय. मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय.


नवी मुंबईत लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन
मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व आमदारांनी विशेष अधिवेशन बोलावन्यात यावे यासाठी आज नवी मुंबईमध्ये मराठी क्रांती मोर्चा तर्फे आमदारांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघातील भाजपा आमदार मंदा म्हात्रे, ऐरोली भाजपा आमदार गणेश नाईक, विधानपरिषद राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा कडून आंदोलन करण्यात आले. यावेळी ढोल वाजवून , घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत घोषणाबाजी करण्यात आली. आमदारांना निवेदन देत मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याची मागणी केली. मराठा समाजातील आरक्षणास आपला पाठिंबा असून तरूणांनी आत्महत्या करू नये असे आवाहन यावेळी आमदारांनी केले आहे. तसेच राज्य सरकारने विशेष आधिवेशन बोलवावे अशी मागणी करण्यात आली आहे.