Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला (Maratha Reservation Survey) आजपासून मराठवाड्यातील (Marathwada) सर्वच जिल्यात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 100 कुटुंबामागे एक प्रगणक यानुसार हे सर्वेक्षण केले जाणार आहे. दरम्यान, गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सुमारे 181 प्रश्न असून, या सर्वांची उत्तरे संबंधित कुटुंबाकडून भरून घेतली जाणार असल्याने प्रत्येक जिल्ह्यात जवळपास चार लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याची वेळ प्रशासनाने दिली.


राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणासाठी राज्यातील सर्वच जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेले प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली असून,आजपासून प्रत्यक्ष घरोघरी जावून सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. तर, हे सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी आवश्यक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. 


गोखले इन्‍स्‍टीटयुटकडून सर्वेक्षण 


राज्‍य मागासवर्ग आयोगाने निश्चित केलेल्‍या निकषानुसार सर्वेक्षणाचे काम युध्‍द पातळीवर पुर्ण करणे बाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या सर्वेक्षणाच्‍या कामासाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी व महानगर पालीका हद्दीत आयुक्‍त महानगर पालीका यांना नोडल अधिकारी म्‍हणून प्राधिकृत करण्‍यात आले आहे. पुण्यातील गोखले इन्‍स्‍टीटयुट या संस्‍थेकडून सर्वेक्षण कामकाजाचे सॉफ्टवेअर तयार करण्‍यात आले असून, राज्‍य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्‍या प्रश्‍नावलीतील माहिती मोबाईलव्‍दारे गावपातळीवर नियुक्‍त केलेले प्रगणक यांच्‍याकडून भरण्‍यात येणार आहे. 


कुणबी प्रमाणपत्राबाबत परभणीत आजपासून विशेष मोहिम


तसेच कुणबी जातीच्‍या नोंदी शोधणे कामी सर्व विभागाना लेखी सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत, ज्‍या गावातील अभिलेखे तपासणी शिल्‍लक राहीले असेल त्‍या गावात पुन्‍हा अभिलेख पडताळणी मोहिम राबविण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. यापुर्वी शोधलेल्‍या कुणबी जातीच्‍या नोंदीची यादी जिल्‍हा संकेतस्‍थळावर तसेच संबंधित गावात प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे. याशिवाय कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरण करण्‍यासाठी अर्ज स्‍वीकृती व दाखले वितरण यासाठी विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे. याचा लाभ घेण्‍याचे, तसेच परभणी जिल्‍हयात दिनांक 23 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी, 2024 या दरम्‍यान होणाऱ्या सर्वेक्षणकामी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन परभणीचे जिल्‍हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जालना, बीड, नगरची शीव ओलांडून मनोज जरांगे पुण्यात धडकले; आंदोलनाचा आजचा चौथा दिवस