Maharashtra Weather Update : एकीकडे उत्तर भारतात हाडं गोठवणारी थंडी (Cold Weather) पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर भारतात थंडीचा गारठा (Winter) वाढत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड (Cold Wave) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच पुढील 48 तासांत महाराष्ट्रात काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामानात अचानक बदल झाल्याने महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट आहे. गेले दोन दिवस विदर्भातील काही शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
थंडीची लाट, त्यात पावसाची हजेरी
महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तर भारतातील थंडीमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढत आहे. हवामान खात्यानेही महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात
हवामानात बदल झाल्याने राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्यानेही विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 48 तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाच्या सरी पाहायला मिळण्याच अंदाज आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
राज्यात थंडी कायम राहणार
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असून, राज्यात थंडी कायम राहील, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात किमान तापमानात हळूहळू थोडी घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भ भागात असणारी कमी दाबाची रेषा कायम असून उत्तर मध्य महाराष्ट्रावरील हवेची चक्रीय स्थितीदेखील कायम आहे. त्यामुळे राज्यात थोडी आर्द्रता असल्याचे दिसून येत आहे. पुढील पाच ते सात दिवस राज्यात बहुतेक भागात कोरडं वातावरण आणि थंडी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत तुरळक ठिकाणी हलके धुकं पाहायला मिळेल. उर्वरित राज्यातील तापमानात फारसा बदल होणार नाही, असंही आयएमडीने सांगितलं आहे.