नांदेड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षण देणार होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आहे, असं  माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं. तसंच मेगाभरती स्थगित केल्याने अनेकांचे नुकसान होईल असं त्यांनी नमूद केलं. ते नांदेडमध्ये बोलत होते.


सध्या आरक्षणाच्या अनुषंगाने बेताल वक्तव्य येत आहेत. नारायण राणे, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रत्येकाची विधाने वेगळी आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जात आहेत. राज्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. मुख्यमंत्री म्हणतात नोकऱ्या देऊ, तर गडकरी म्हणतात नोकऱ्या आहेत कुठे. पण शासन सेवेतील 24 लाख जागा रिक्त आहेत, असा दावा अशोक चव्हाणांनी केला.


गावितांवरील हल्ल्याचा निषेध

भाजप खासदार हीना गावित यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे, पण शासनाच्या वेळकाढू धोरणाचे हे परिणाम आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले. हीना गावित यांच्या गाडीवर चढून मराठा आरक्षण आंदोलकांनी निषेध नोंदवला होता.

मेगाभरती रद्द केल्याने अनेकांचे नुकसान

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत 36 हजार जागांची मेगाभरती रद्द करण्याचा निर्णय काल जाहीर केला. मराठा आंदोलकांनी ही मागणी केली होती.

त्याबाबत अशोक चव्हाण म्हणाले, “मेगाभारती रद्द केल्यामुळे अनेक तरुणांचे नुकसान होणार आहे. अनेक तरुण एज बार अर्थात ते वयोमर्यादा ओलांडतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतचा खुलासा करावा”

मुस्लिम आरक्षणबाबत सरकार गप्प का?

काँग्रेस आरक्षणाबाबत कुरखोडीचे राजकारण करत नाही. आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. पण सरकार मुस्लिम आरक्षणबाबत गप्प का? असा सवाल अशोक चव्हाणांनी विचारला.

संबंधित बातम्या 

गडकरी म्हणाले, नोकऱ्या कुठे आहेत? राहुल गांधी म्हणाले-उत्तम प्रश्न  

मेगाभरती स्थगित, नोव्हेंबरपर्यंत आरक्षण प्रक्रिया: मुख्यमंत्री