अहमदनगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाटत असेल आरक्षणाचा नोकरीत फायदा नाही, तर ओबीसी, एससी, एसटी यांचं आरक्षण काढून घेण्याची हिंमत आहे का? असा सवाल शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.


औरंगाबादहून पुण्याकडे बैठकीला जात असताना अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहावर हर्षवर्धन काही वेळ थांबले असता त्यांनी गडकरींनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. आरक्षणासाठी रोज तरुण आत्महत्या करत आहेत.  अशा वेळी तातडीने निर्णय घेणं गरजेचं असताना गडकरी यांचं विधान विषयांतर करण्यासाठी असल्याचं ते म्हणाले.

राजकीय व्होट बँकेच्या नादात प्रत्येक पक्षाने जाती-जातीत वितुष्ट निर्माण केलंय आणि हे वितुष्ट संपवण्यासाठी वेगळा पक्ष निर्माण करण्याची गरज असल्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार हर्षवर्धन जाधव यांनी केला.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावाई आहेत.

गडकरी काय म्हणाले?

जाती-धर्मावर नव्हे, तर जात आणि धर्म बाजूला ठेवून, जे अत्यंत गरीब आहेत, त्यांचाही काही विचार करायला पाहिजे, असं मत गडकरींनी व्यक्त केलं. गडकरी औरंगाबादेत बोलत होते.

आरक्षण जरी दिलं तरी नोकऱ्या कुठं आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर, अशा आंदोलनात आगीत तेल ओतण्याचं काम जबाबदार पक्षांनी करु नये, असंही गडकरींनी आवाहन केलं.

तसेच या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वाट काढतील, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.