नागपूर : आई ओबीसी (OBC) असेल तर तिच्या मुलांनाही कुणबी ओबीसी दाखला मिळावा ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)  केली आहे. या मागणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली आहे या संदर्भात उपसमिती सर्व कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी मनोज जरांगे यांच्या मागणीवर निर्णय होणार नसल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे.


मुलांच्या जन्माच्या दोन महिन्याच्या आत वडिलांचा मृत्यू झाला आणि आईनेच मुलांचं पालनपोषण केलं असेल तर आईची जात लावता येईल असं कोर्टाने एका निकालात म्हटलंय. तसंच दुसरीकडे राज्यातल्या एका राजकीय कुटुंबाने अशी मागणी केल्यावर मुंबई हायकोर्टाने ही मागणी फेटाळली होती. त्यामुळे याचा आधार घेत कायदेशीर बाबी तपासल्यावर यावर निर्णय घेतला जाईल. जर असा निर्णय घ्यायचा असेल तर तो सर्वच जातींना लागू राहील असा ही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे तूर्तास जरांगेंच्या या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता धूसर दिसत आहे.


 न्यायमूर्ती  शिंदे समितीचा दुसरा अहवाल मराठा उपसमितीने स्वीकारला  


मराठा आरक्षणासंदर्भातला न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल मराठा उपसमितीने स्वीकारला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातला आज कॅबिनेट बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आरक्षणावर आज मुख्यमंत्री विधिमंडळात भूमिका मांडणार आहेत. नागपुरात काल मराठा उपसमितीची बैठक पार पडली.


मराठवाड्यातील कुणबी नोंदी अहवाल एबीपी माझाच्या


शिंदे समितीचा मराठवाड्यातील कुणबी नोंदी अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे.   मराठवाड्यात आतापर्यंत एकूण  जवळपास 29 हजार नोंदी आढळल्या आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 1,94, 86, 560 दस्तऐवज तपासल्यावर 27 हजार 626 नोंदी आढळून आल्या होत्या . तिसऱ्या अहवालात आणखी 1200 नोंदी अढळून आल्याने संख्या 28 हजार 826 पोहचली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अजूनही सर्वेक्षण सुरूच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


जात प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक भूमी अभिलेख विभागातील कागदपत्रे सादर


मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक भूमी अभिलेख विभागातील कागदपत्रे सादर करण्यात आली आहे. या कागदपत्रांमध्ये मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठीच्या आवश्यक नोंदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1967 पूर्वीच्या या नोंदी असल्यामुळे जात वैधता पडताळणी समिती समोर जात प्रमाणपत्र सादर केल्यावर अडचणी येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे समितीकडून तब्बल मराठा कुणबी, कुणबी मराठा आशा 54 लाख नोंदी मिळाल्याची अहवालात नोंद दिली आहे. 


हे ही वाचा :


आईकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास मुलालाही ओबीसीचा लाभ द्या; मनोज जरांगेंची नवी मागणी