कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी आज पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati)यांच्यावर निशाणा साधला. संभाजीराजे यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे की आंदोलनामध्ये चालढकल केली तर ते समजण्याइतका मराठा (Maratha) समाज सुज्ञ आहे. संभाजीराजे यांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. पण सरकारला वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहोत का याचा देखील विचार केला गेला पाहिजे. सुरुवातीला रायगडावरुन मोर्चाची हाक दिली. त्यानंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हणता. त्यानंतर पुण्यातून मुंबईपर्यंत लाँगमार्च काढणार म्हणता. तुम्ही एकदा समाजाला काय करणार आहात हे नीट समजावून सांगा. जर 16 तारखेला मोर्चा काढणार असं म्हणालो नाही म्हटलात तर ठीक आम्ही मोर्चा काढणार नाही. पण दुसऱ्या कुणी मोर्चा काढला तर त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


Maratha Reservation : समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला; संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन


कोविडचे नियम पाळून वारीला परवानगी द्या


पंढरपूरच्या वारीसाठी (Pandharpur Wari) वारकऱ्यांना कोविडचे नियम पाळून परवानगी मिळालीच पाहिजे अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केलीय. सर्व काही नियम पाळून सुरु आहे मग वारीवर बंदी का आणता. शरद पवार साहेब हे आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी हॉटेल व्यावसायिकांची काळजी आहे असं सांगितलं होतं, हे सगळं काही कळतंच नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.


कोरोनात काय केलं याची श्वेतपत्रिका काढा


कोरोना काळात सरकारनं कोणतीच मदत केली नाही. उलट हजारो मृत्यू सरकारकडून लपवले जात आहेत. देशात तीन लाख मृत्यू कोरोनामुळे झालेत त्यापैकी एक लाख आपल्या राज्यात झाले आहेत. त्यामुळं आकडे लपवून पाठ थोपटून का घेता? पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही सरकारनं दुर्लक्ष केलं. पुणे आणि मुंबई महापालिकांनी त्या-त्या ठिकाणी मोठा खर्च केला. मग सरकारनं काय केलं याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केलीय. 


शरद पवार- प्रशांत किशोर भेटीवर बोलण्यास नकार


दरम्यान शरद पवार आणि प्रशांत किशोर (Prashant Kishor meets Sharad Pawar in Mumbai) यांच्यातल्या भेटीवर मात्र बोलण्यास चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला आहे. ती भेट शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील आहे. त्यावर मी बोलणं योग्य नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.