धुळे : मराठा आंदोलनामुळे एसटीचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या 25 दिवसात राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे एसटीचं तब्बल 50 कोटींचं नुकसान झालं. एसटी बसची तोडफोड, जाळपोळ, बसच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे एसटी परिवहन मंडळाचा बुडालेला महसूल यांचा नुकसानामध्ये समावेश करण्यात आला आहे.


एसटीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात विविध ठिकाणी गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आंदोलनांमुळे एसटीचं आजवरचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या बस जोपर्यंत पुन्हा मार्गावर धावत नाहीत तितक्या दिवसाचं एसटीचं बुडणारं उत्पन्न, एसटीच्या महसुलावर यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा परिणाम या सर्व घटकांचा विचार करता एसटीचं 50 कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आजच्या महाराष्ट्र बंद दरम्यान राज्यात 16 एसटी बसची तोडफोड झाली. यात औरंगाबाद विभागातील 11, नाशिक विभागातील पाच, नागपूर विभागातील एका बसचा समावेश आहे. विदर्भात 50 टक्के, तर पालघर विभागात 83 टक्के एसटीची वाहतूक सुरु होती, असा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. 80 हजार 209 फेऱ्यांपैकी 8 हजार 56 फेऱ्या आज दुपारी चार वाजेपर्यंत झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. राज्यात 9 ऑगस्टच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत काही आगारातील बस सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद होती.

9 ऑगस्टला महाराष्ट्र बंद दरम्यान एसटीचं झालेलं नुकसान पाहता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या या एसटीतून आपल्या कुटुंबातील, परिचयातील व्यक्तीही प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांनाही दुखापत होऊ शकते, किंवा त्यांचा खोळंबा होऊ शकतो, याचं भान आंदोलकांनी ठेवावं. एसटीचं नुकसान करुन पर्यायाने स्वतःचंच नुकसान होतं, याची जाणीव आंदोलकांनी ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.