संभाजीराजे काय म्हणाले?
"राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा 1902 साली आरक्षण दिलं होतं. बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये एससी, एसटी, ओबीसीसह सर्व जातींचा समावेश होता. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाचाही समावेश होता. आज स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने भावना तीव्र झाल्या आहेत.
अनेक मोर्चे मागील वर्षी निघाले. त्याची दखल देशानेच नव्हे तर जगाने घेतली. पण आता भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला माझ्या दोन सूचना आहेत.
पहिली सूचना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना बोलवावं आणि त्यांच्या मागण्या मान्य करावं.
दुसरी सूचना - राजकारण करण्यापेक्षा सर्व पक्षांना एकत्र बोलवून, मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा"
राज्यसभा सभापतींची टीपणी
संभाजीराजेंच्या या निवेदनानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडून यांनी, आरक्षणाची मागणी योग्य आहे, पण मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणं कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला.
महाराष्ट्र बंद
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
आज सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. बीडमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमुळे शहरातून एकही बस शहराबाहेर पडू शकलेली नाही. दररोज बीडमधून ये-जा करणाऱ्या 431 बस फेऱ्या आज बंद आहेत. काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्यानं एसटी महामंडळानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
परभणी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. यामुळे काही काळ सचखंड , परळी पॅसेंजर आणि हैद्राबाद पॅसेंजर ट्रेन रोखण्यात आली होती. रुळावर बसून आंदोलकांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. उस्मानाबादमध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाने एकमतानं मराठा मोर्चाला पाठिंबा दिला. यासोबत नांदेडसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पाळला जातोय.