लातूर, अकोला आणि जालन्यात आज मराठा समाजाचे मूक मोर्चे
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2016 09:44 AM (IST)
जालना : कोपर्डीमधील अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या विराट मूक मोर्चाचं लातूर, जालना आणि अकोल्यात आज आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान जालन्यात या मोर्चाला सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध शहरांत हे मूक मोर्चे काढण्यात आले आहेत. कोपर्डीतील बलात्कार प्रकरणानंतर मराठा क्रांती मोर्चांना सुरुवात झाली. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, यासोबतच अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा, अशा मागण्या या मोर्चांद्वारे करण्यात येत आहेत. मराठा क्रांती मूक मोर्चांच आयोजन नांदेड, फलटण आणि इंदापूरमध्ये काल करण्यात आलं होतं. या मोर्चांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. यानंतरही मराठा क्रांती मूक मोर्चांच आयोजन राज्यातील विविध शहरांमध्ये करण्यात आलं आहे. यात पुणे, सातारा, सांगली नवी मुंबई आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे. मराठा समाजाच्या मूक मोर्चे हे दलितविरोधी नसल्याचं सांगत प्रतिमोर्चे न काढण्याचं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. संबंधित बातम्या :