वर्धा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा ''महाराष्ट्र भूषण'' सन्मान परत घ्यावा, या नव्या मागणीसह वर्ध्यात मराठा मोर्चा काढला गेला. पुरंदरे यांनी आपल्या लिखाणात जिजाऊ आणि शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप मोर्चकरांनी आपल्या निवेदनात केला.
सकल मराठा-कुणबी या नावानं निघालेला वर्ध्यातला मोर्चा दुपारी एक वाजता जुन्या आरटीओ कार्यालयापासून सुरु झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन या मोर्चाची सांगता केली गेली.
एकाच दिवशी राज्यातल्या चार ठिकाणी मराठा मोर्चांनी धडक दिली. यापैकी वर्ध्यातल्या मोर्चात इतर मागण्यांबरोबरच पुरंदरे यांचा ''महाराष्ट्र भूषण'' सन्मान परत घेण्याची मागणी केली गेली.
-----------------------------------
UPDATE : रायगडमधील माणगाव आणि सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये मराठा मोर्चाला सुरुवात
-----------------------------------
मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आज कोकणात दाखल होणार आहे. कोकणातील मराठा समाजही सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये एकवटणार आहे. रायगडच्या माणगाव जवळील निजामपूर रोडवरुन या मोर्चाची सुरुवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे आणि स्थानिक आमदारही या मोर्चाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गातही मराठा मोर्चा निघणार आहे. ओरस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिंधुदुर्गातील मोर्चाची सुरवात होईल.
वर्ध्यात मराठा कुणबी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर पालघरमध्येही मोर्चा काढून मराठा समाज आरक्षणाची मागणी करणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाही कोकणवासीयांना तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आजच्या मोर्चाकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.