पुणे: ख्यातनाम अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन झालं. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असतानाच, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.


'नाट्यत्रिविधा' या नाटकाचा प्रयोग सुरु होता. त्याचवेळी त्यांना रंगमंचावरच मृत्यूने गाठलं. धक्कादायक म्हणजे या नाटकाचा प्रयोग सुरु होता, त्यावेळी शेवटच्या प्रसंगाला डान्स करत असताना, अश्विनी यांनी गिरकी घेतली आणि त्याचवेळी त्या रंगमंचावर कोसळल्या. मात्र हा नाटकातीलच भाग आहे, अशीच धारणा उपस्थितांची झाली. त्यादरम्यानच पडदाही पडला, मात्र अश्विनी जमिनीवर कोसळल्या, त्या कायमच्याच.



अश्विनी एकबोटे यांच्या अकस्मात निधनाने सिने-नाट्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली. संपूर्ण सिने-नाट्य क्षेत्र शोकसागरात बुडालं आहे.


अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे.

सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या 'गणपती बाप्पा माोरया' या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या.

अश्विनी यांनी अनेक मराठी चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी सिनेमात त्यांची भूमिका होती.