पुणे : पुण्यात 5 लाखात घर देण्याची घोषणा करणाऱ्या मॅपल कंपनीवर गुन्हेगारी कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले खरे,  पण या कंपनीवर अशी कोणतीही कारवाई अद्याप झाली नसल्याचं चित्र दिसतंय.

 

नेहमीप्रमाणे आज सकाळपासून मॅपलच्या विविध केंद्रांवर घरांच्या नोंदणीसाठी झुंबड उडाली आहे. ज्यांनी एबीपी माझाची बातमी पाहिली, ते शहानिशा करण्यासाठी केंद्रावर रांगा लावत आहेत, पण त्याचेळी नव्याने नोंदणी करणाऱ्यांच्याही रांगा लागल्या आहेत.

 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 5 लाख रुपयात स्वस्तातलं घर देण्याची योजना मॅपल ग्रुपनं जाहीर केली.  ज्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो झळकत होता.

 

त्यामुळं मॅपल ग्रुपची बदमाशी बापटांच्या आशीर्वादानं सुरु होती का? अशी चर्चा सुरु झाली.

 

भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या ग्रुपविरोधात गुन्हेगारी कारवाई करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. पण आताचा रागरंग पाहाता, अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं दिसतंय.

 

काय आहेआपलं घर‘  योजना?


गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या अवतीभवती 5 लाखांमध्ये ‘आपलं घर’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 10 हजार लोकांनी नोंदणी केल्याचं कळतं.

 

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ही योजना राबवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक अर्जदाराकडून 1 हजार 150 रुपये अनामत रक्कम परत न देण्याच्या अटीवर भरुन घेण्यात आली आहे.

 

जे अर्जदार पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना 5 लाखात आणि जे ठरणार नाहीत, त्यांना साडे सात लाखामध्ये वन बीएचके फ्लॅट मिळेल अशी जाहिरात करण्यात आली आहे. अर्थात, त्याआधी लॉटरीसुद्धा काढली जाणार आहे.


संबंधित बातमी :


‘आपलं घर’चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता


पुण्यातील ‘5 लाखात आपले घर’ योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


फोटो : काय आहे पुण्यातील ‘5 लाखात आपलं घर’ योजना?