गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी भरदिवसा दोन ट्रक आणि ट्रॅक्टर जाळला
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2017 05:44 PM (IST)
गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून भरदिवसा बांबूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक व एक ट्रॅक्टरची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी-पोटेगाव मार्गावर ही घटना घडली आहे. जाळपोळीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. चामोर्शी तालुक्यातील घोट वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कोठारी जंगल परिसरात गेल्या काही दिवसापासून बांबू कापण्याचं काम सुरु आहे. ट्रक आणि ट्रॅक्टरने कापलेल्या बांबूची वाहतूक करण्याचं काम सुरु होतं. नियमितप्रमाणे कापलेल्या बांबूची वाहतूक करण्यासाठी काही ट्रक आणि ट्रॅक्टर रेंगडी, पोटेगाव जंगलात गेले होते. दुपारी दोन वाजताच्या दरम्यान बांबू भरून घोटकडे नेताना नक्षलवाद्यांनी दोन ट्रक आणि एका ट्रॅक्टरला रस्त्यात थांबवून यातील चालक आणि मजुरांना खाली उतरवून आग लावली. या आगीत संपूर्ण वाहन जळून राख झाली. नक्षलवाद्यांकडून काही दिवसांपासून हत्या, जाळपोळच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यातच आज नक्षलवाद्यांनी भर दिवसा वाहनाला आग लावल्यानं परिसरात दहशत निर्माण झाली आहे.