रत्नागिरी : सलग चार दिवस जोडून आलेल्या सुट्ट्या आणि आंब्यांचा हंगाम यामुळे कोकण हाऊसफुल्ल झालं आहे. शाळांच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु आहे आणि या सुट्ट्यांच्या हंगामातील पहिला लॉंग वीक एंड सध्या सुरु आहे. यामुळे कोकणातील दापोली गुहागरपासून रत्नागिरी मालवण ते देवबागपर्यंतचे सर्वच किनारे पर्यटकांनी भरुन गेले आहेत.
जशी गर्दी कोकणातील सर्वच समुद्रकिनारी आहे, तशीच गर्दी कोकणातील सगळ्या प्रसिद्ध देवस्थानातही अशीच गर्दी पहायला मिळते आहे. रत्नागिरीमध्ये या चार दिवसांमध्ये मँगो सिटी रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे रत्नागिरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना व्हॅली क्रोसिंग, बॅक वॉटर सफारी, केव्हिंग अशा अनेक गोष्टी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्गचे किनारेही पर्यटकांनी फुलून गेले आहेत. देवबाग वेंगुर्ला अशा सगळ्याच किनाऱ्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने आलेले आहेत. गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर येणाऱ्या हजारो पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी इथे विशेष काळजी घेतली जात आहे.
महाराष्ट्राबाहेरुनही मोठ्या संख्येने पर्यटक या चार दिवसांसाठी कोकणात आलेले पहायला मिळत आहेत. काही अति उत्साही पर्यटक स्थानिकांनी वारंवार सांगूनही गाड्या समुद्रकिनारी नेत आहेत आणि वाळूत फसलेल्या गाड्या काढताना त्यांची दमछाक होते आहे. तर कोकणाकडे येणाऱ्या सगळ्याच मार्गांवर पर्यटकांच्या गाड्यांच्या मोठ्या रांगा अनुभवायला मिळत आहेत. कोकणचा हापूस, इथले समुद्र किनारे आणि अस्सल कोकणी स्वादाचं जेवण यामुळे चार दिवसांची ही सुट्टी पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरते आहे.