Maratha Reservation News Update :  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. त्यांची प्रकृती अतिशय (Manoj Jarange Patil Health News)  खालवली आहे. अन्न-पाणी नसल्यामुळे मनोज जरांगे यांना उपचाराची गरज आहे. पण मागणी मान्य झाल्याशिवाय उपचार घेणार नाही, यावर जरांगे ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हायकोर्टात धाव घेत तक्रार केली. त्यावर कोर्टानं मनोज जरांगे उपचार घेणार की नाही?, पुढच्या 10 मिनिटांत आम्हाला सांगा, असे मनोज जरांगेंच्या वकिलांना सांगितलेय.  जरांगेंच्या वकिलांना आंदोलनस्थळी जरांगे किंवा त्यांच्या समर्थकांशी बोलून कळवण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे.


मनोज जरांगे प्रशासनाला  वैद्यकीय देखरेख करू देत नाहीत, अशी तक्रार राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात केली. रक्त तपासणीला मनोज जरांगें नकार देतायत, असे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. जरांगेंची प्रकृती अधिक बिघडणार याची काय काळजी घेताय?, हायकोर्टाचा जरांगेच्या वकिलांना सवाल विचारण्यात आला. 


उपचार स्वीकारण्यात तुम्हाला काय अडचण आहे?


14 फेब्रुवारीला जरांगेंनी प्राथमिक उपचार घेतली, तसेच आजही तपासणी झाल्याची वकिलांकडून हायकोर्टात माहिती दिली. जरांगेंच्या उपोषण आंदोलनाविरोधात डॉ. गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. जर राज्य सरकार तुमची काळजी घेतंय तर, उपचार स्वीकारण्यात तुम्हाला काय अडचण आहे? असा सवाल हायकोर्टाकडून विचारण्यात आला. भारताचे नागरीक या नात्यानं आंदोलन करणं हा तुमचा अधिकार, पण त्यामुळे कायदा सुव्यस्थेची परिस्थिची निर्माण होणार नाही, ही देखील तुमची जबाबदारी आहे. असेही कोर्टानं म्हटलेय. कुठल्याही आंदोलनामुळे जनतेला त्रास होता कामा नये, असे हायकोर्टाने सांगितलेय.  


मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक


मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. 'पाणी घ्या' म्हणत घोषणाबाजी सुरु आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषस्थळी दाखल झाले आहेत. तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे. त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यावेळी सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगेंना पाणी पाजलं. मनोज जरांगे यांनी एक ग्लास पाणी घेतलं. आंदोलक, सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानंतर त्यांनी पाणी घेतलं.


जरांगे पाटलांना ग्लानी आली


सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती आणखी (Health Updates) बिघडली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला आहे. यासोबतच त्यांना पोटदुखीचाही त्रास (Stomach Pain) होत आहे. गुरुवारी (15 फेब्रुवारी) सकाळपासून मनोज जरांगेंची प्रकृती आणखी बिघडली आणि अशक्तपणामुळे त्यांना ग्लानीही आली. जरांगे पाटीलांची तब्येत बिघडत चालल्याने महिलांची रडारड सुरु आहे. जरांगे 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह नागरिक करत आहेत, 'पाणी घ्या' म्हणत आंदोलनस्थळी उपस्थितांची घोषणाबाजी सुरु आहे.