Manoj Jarange In Nashik : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निघालेल्या अध्यादेशानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. याच दौऱ्यादरम्यान आज मनोज जरांगे (Manoj Jarange) छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) बालेकिल्ल्यात धडकणार आहेत. जरांगे हे आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे याच दौऱ्यात मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी जरांगेंचे जल्लोषात स्वागत करत जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले जाण्याची शक्यता आहे. याच दौऱ्यात मनोज जरांगे हे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शनही घेणार आहे. त्यामुळे जरांगे यांचा आजचा नाशिक दौरा चर्चेत आला आहे. 


मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकराने काढलेल्या अध्यादेशाला देखील भुजबळ यांनी विरोध केला आहे. अशात आज मनोज जरांगे छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात धडक देणार आहे. महाराष्ट्राचा दौरा करत असतांना जरांगे आज नाशिक जिल्ह्यात असणार आहे. त्यामुळे आपल्या या दौऱ्यात जरांगे काय बोलणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. 


मनोज जरांगेंचा पुढील तीन दिवसांचा दौरा...



  • 8 फेब्रुवारी 2024 : दादर मुंबईतून- नाशिक मार्गे- सटाणा मार्गे साल्हेर किल्ला येथे सकाळी 11 वाजता नियोजित कार्यक्रम. त्यानंतर सान्हेर किल्याहुन छत्रपती संभाजीनगर मार्गे- आंतरवाली सराटी.

  • 9 फेब्रुवारी 2024 : आंतरवालीहून– भोगलगाव (जिल्हा-बीड) येथे सकाळी 10 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर भोगलगावहून – बीड मार्गे- कोळवाडी (मांजरसुबा घाट) येथे दुपारी 12 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर कोळवाडीहून बीड - गेवराई मार्गे - आंतरवाली सराटी.

  • 10 फेब्रुवारी 2024 : आंतरवाली सराटी येथे सकाळी 10 वाजता महत्वाची बैठक व त्यानंतर मनोज  जरांगे पाटिल यांचे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.


मनोज जरांगे राजकारणात जाणार का? 


मनोज जरांगे हे राजकारणात येऊ शकतात किंवा त्यांनी यावे अशी अनेकदा चर्चा झाली. यावर बुधवारी मुंबईत बोलतांना जरांगे म्हणाले की, “राजकारणाची खुर्ची वेगळी आहे. मी सामान्य घरातून आलोय आणि सामान्य लोकांसाठी आलोय. समाजाला न्याय दिल्यानंतर आमच्या या सामाजिक खुर्चीत बसेल. राजकारणाची खुर्ची नको रे बाबा... असे मनोज जरांगे म्हणाले. 


पुन्हा आमरण उपोषण करणार...


मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकराने नवीन अध्यादेश काढला आहे. मात्र, या अध्यादेशाची अमलबजावणी होत नसल्याने जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीपर्यंत जर या अध्यादेशाची अमलबजावणी झाली नाही, तर आपण 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे हे आमरण उपोषण कठोर असणार असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतलीय, पक्षासह 'त्या' नेत्यांची नावं उघड करणार; मनोज जरांगेंचा इशारा