Manoj Jarange News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) सुरु केलेल्या  उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतोय. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे.


मराठा संघटनांनी बंदची हाक दिली -


मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे. आज जालना, बीड, सोलापूर आणि नाशिकमधील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज उत्तर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज बांधवाकडून सोलापुरातील कोंडी गावात ही बंद पुकारला आहे. गावात सकाळपासून सर्व दुकाने बंद, केवळ दुध आणि अत्यावश्यक सेवा सुरु  आहे. सरकारने दिलेला शब्द पाळत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवाची भूमिका आहे.  


प्रकृती खालावली - 


मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. अन्न पाणी न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. गावकरी, मित्र सहकाऱ्यांकडून वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह होतोय.  सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून, पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली.  


मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या...



  • मराठा आरक्षणाबाबत सरकराने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करून, विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करणयात यावे.

  • आंतरवाली सराटीसह राज्यभरात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

  • राज्यभरात शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदींची यादी संबंधित ग्रामपंचायतवर लावण्यात यावी.