Manoj Jarange Patil : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 34 दिवस झाल्यानंतरही तपास करत असलेल्या एसआयटीकडून तसेच सीआयडी आणि बीड पोलिसांकडून कोणतीच माहिती देत नसल्याने आज संतोष देशमुख कुटुंबीयांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आणि न्यायासाठी एकच आक्रोश केला. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट गावच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तब्बल अडीच तास ते पाण्याच्या टाकीवर होते.


मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या कळकळीच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख यांनी टाकीवरून खाली उतरल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पोलिसांकडून तपासासंदर्भात कोणतीच माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना देशमुख यांच्यासह गावकऱ्यांनी राज्य सरकारला उद्या (14 जानेवारी) सकाळी दहा वाजेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. कृष्णा आंधळे आरोपी अद्यापही मोकाटच आहे. आंधळेला तत्काळ अटक करावी. तसेच वाल्मीक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याला संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सहआरोपी करून मोका लावावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.


खंडणीखोर आणि खून प्रकरणातील आरोपी एकच आहेत


यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा वाल्मीक कराड मोक्यातून सुटल्याने निर्वाणीचा इशारा दिला आहे. पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाची योग्य माहिती देत नसल्याबद्दल आणि खंडणीखोर वाल्मीक कराडवर मोका अंतर्गत कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला शेवटची विनंती आहे. खंडणीखोर आणि खून प्रकरणातील आरोपी एकच आहेत. या सर्व आरोपींना मोका लावावा आणि 302 कलम लावावं लागेल, असा इशारा दिला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डबल गेम करत आहेत का? अशी विचारणा सुद्धा जरांगे पाटील यांनी केली. देशमुख कुटुंब न्यायासाठी आपल्या दारापर्यंत आले होते, याची आठवण सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी करून दिली.


मुख्यमंत्र्यांनी योग्य कारवाई करावी. त्यांनी आरोपींना पाठीशी घालू नये. त्यांच्या शब्दांवर देशमुख कुटुंबावर विश्वास ठेवला. पण त्यांनी कारवाई केली नाही. सर्व माहिती असतानाही कुटुंबावर अशी वेळ येत असेल तर हे एक षड्यंत्र आहे. यांना मोबाईल सापडत नाही, फरार आरोपी सापडत नाही, कराडवर मोका लावला नाही, यामुळे सरकार विरोधात आता जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जरांगे यांनी दिला. 


पोलीस निरीक्षक प्रशांत महाजनला सहआरोपी करा


दरम्यान, गावकऱ्यांनी वाल्मिक कराडवर मोका लावून, सरपंच हत्येमध्ये सहआरोपी, मोकाट कृष्णा आंधळेला अटक, शासकीय वकील म्हणून उज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती, एसआयटीत पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती, तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना द्या, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजनला बडतर्फ करून सहआरोपी करा आदी मागण्या गावकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या