बीड: धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्याशिवाय वाल्मिक कराड याच्यावर कारवाई होणार नाही. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर डील करण्यासाठी गेले होते. याठिकाणी नोटा मोजतानाचे त्यांचे फोटो समोर आले आहेत, असे वक्तव्य बीड शहरचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. सगळ्या लोकांचे सीडीआर तपासल्यास ही गोष्टी समोर येईल. मात्र, वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचे कटकारस्थान रचल्याप्रकरणी 302 चा गुन्हा दाखल का केला जात नाही, असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला.


संतोष देशमुखांचा एक मारेकरी फरार आहे. धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे हा विषय होतोय. सह्याद्री अतिथीगृहावर नोटा मोजतानाचे फोटो समोर आले आहेत. सह्याद्रीसारख्या ठिकाणीही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे डिलिंग करण्यासाठी बसतात. यावरुन तुम्हाला सगळ्या प्रकाराची कल्पना येईल. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांचा राजीनामाच घेतला पाहिजे. सीडीआरच्या आधारे तपास झाला पाहिजे. वाल्मिक कराडला फाशी झाल्याशिवाय स्थानिक जनता आणि आम्ही शांत बसणार नाही, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. 


वाल्मिक कराड हा माणूस इतरांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात पटाईत आहे. वाल्मिक कराड यांनी या प्रकरणात अटक होण्यासाठी वेळ घेतला. ते स्वत: सरेंडर झाले. वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाची सुई अडकल्यासारखी झालेली आहे. बाकी प्रशासन आणि पोलिसांचा तपास पळत आहे, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. विष्णू चाटे याने संतोष देशमुख यांची हत्या केली. विष्णू चाटेचे कनेक्शन पूर्णपणे वाल्मिक कराड याच्याशी आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली.


बीडच्या मस्साजोग गावात धनंजय देशमुखांचे आंदोलन


बीडच्या मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु केले आहे. वाल्मिक कराड याच्यावरही मोक्काचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. धनंजय देशमुख मस्साजोग गावातील टॉवरवर चढून आंदोलन करणार होते. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, धनंजय देशमुख सोमवारी सकाळी नॉट रिचेबल झाले आणि थोड्यावेळाने थेट मस्साजोग गावातील पाण्याच्या टाकीवर दिसून आले. सध्या धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर बसून आहेत. पोलीस आणि मनोज जरांगे यांनी विनंती करुनही ते खाली उतरायला तयार नाहीत. धनंजय देशमुखांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीची शिडी काढून टाकली आहे. त्यामुळे पोलिसांना वर जाण्यासाठी मार्ग उरलेला नाही.



आणखी वाचा


संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब