Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : सगेसोगरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी तसेच इतर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सलाईन लावून उपोषण करून काहीच फायदा होत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले व त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतानाच लढा मात्र थांबला नसल्याचे स्पष्ट केले. पाटील यांनी नारायण गडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते उपोषण सोडवले. त्यामुळे पाचव्या दिवशी उपोषण स्थगित करण्यात आले. 


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस यांच्यावर आरोपांची मालिकाच करताना जेलमध्ये टाकण्याचं नियोजन असल्याचा गंभीर आरोप केला. 


फडणवीसांना बांध फोडायची सवय लागली


दरम्यान, यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस मला आत नेऊन गोळ्या घालायला लावतील, मी शंभूराजे सारखं मरायला घाबरत नाही. ते पुढे म्हणाले की नितीन गडकरींसारखा माणूस नाही, काम हाती घेतले की तडीस नेतो. मात्र फडणवीसांना बांध फोडायची सवय लागल्याची खूप बोचरी टीका जरांगे पाटील यांनी केली. फडणवीस यांनी मुंडे महाजन घराणं संपवल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. मुंडेंच्या बोटाला धरून फडणवीस मोठे झाले. मात्र, त्यांनी कित्येक घराण्यांचं वाटोळ केल्याचा आरोप सुद्धा केला. 


40 एक आमदार पाडण्याची तयारी करणार


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझी शक्तीच उपोषण आहे. काही ना काही समाजाला आरक्षण देऊ शकलो. मी ओबीसीमधून आरक्षण दिलं. उद्या मला सरकारनं मारलं तरी माझं जीवन सार्थकी लागले असल्याचे असल्याचे म्हणाले. अंतरवाली सराटीमधील मंडप काढू तसेच अंतरवालीमधील विकास रखडलेला आहे. आपलं आता पैठण फाटा येथे कार्यालय होत असल्याचे ते म्हणाले. काही लोकांना रक्त कळत नाही, काही लोक कुरापती करतात असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या तोफ डागली. दरम्यान, 40 एक आमदार पाडण्याची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. विधानसभेत आपलं बोलायला कोणी तयार नाही. पिकांना भाव मिळेनासा झाला आहे. आरक्षणाचा विषय मांडायला कोणी नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या