नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईमध्ये मैदानाची परवानगी न मिळूनही लोणावळ्यातून मुंबईसाठी प्रस्थान केलं. मराठा समाजातील हजारो समर्थकांसह त्यांनी मुंबईकडे कूच केली आहे. नवी मुंबईमधील ( Navi Mumbai) कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केटमध्ये मराठा आंदोलकांची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी राज्यभरातून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. उद्या सकाळपर्यंत मुंबईमध्ये मराठा वादळ पोहोचण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मराठा समाजाच्या पदयात्रेला भूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता हे वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालं आहे. 


आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही


दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली नसली तरी, मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत. मात्र, आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. जरांगे पाटील यांनी आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.


राज्यभरातून आंदोलक दाखल होण्यास सुरुवात 


दुसरीकडे, राज्यभरातून मुंबईमधील आंदोलनासाठी समर्थन देण्यासाठी पोहोचू लागले आहेत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातून सुद्धा आंदोलक मुंबईमध्ये पोहोचले आहेत. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या सर्व आंदोलकांची जेवणाची सोय करण्यात आली आहे. कितीही दिवस लागले, तरी आम्ही मुंबई सोडणार नाही, असा निर्धार या आंदोलकांनी बोलून दाखवला आहे. 


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे नवी मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटे मार्केटमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची सोय करण्यात आली आहेत. कांदा बटाटा मार्केटमध्ये उद्या सकाळी 26 जानेवारी निमित्त झेंडावंदन झाल्यानंतर त्यांची वाशीमध्ये सुद्धा भव्यसभा होणार आहे. मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने येत असलं, तरी त्यांना अजून मैदान मिळालेलं नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या