Manoj Jarange Patil : सरकारनं आमच्याकडून 40 दिवसांचा वेळ घेतला आहे. तुम्ही बदला, मग 40 व्या दिवसानंतर गाठ मराठ्यांशी असल्याचा इशारा मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा आंदोलन मोडण्याचा कोणी प्रयत्न केला असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला, यावेळी ते म्हणाले की, पोलिसांना मारले म्हणून आमच्यावर आरोप केला. आम्ही शांततेत बसलो होतो, लहान लहान मुलं असणाऱ्या महिला तिथं आंदोलनात बसल्या होत्या. अशा आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला. हा डाव सरकारनं आखला होता. हा जर डाव सरकारनं आखला नसता तर एक तरी पोलिस बडतर्फ केला असता, पण आत्तापर्यंत एकही पोलिस बडतर्फ केला नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
आमचं रक्त सांडलंय, मागे हटणार नाही
मराठा समाज हा राज्यातील सर्वांत मोठा समाज आहे. राज्याचे पालकत्व स्वीकारलेल्या लोकांनी समान न्याय करायला हवा असे जरांगे पाटील म्हणाले. राज्याचे गृहमंत्री माफी मागताना असे म्हणाले की निष्पाप लोकांवर हल्ला झाला. जर निष्पाप लोकांवर हल्ला झाला असेल तर मग त्यानंतर अधिकारी का बडतर्फ झाले नाहीत? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. आमच्या सगळ्या मंत्रीमंडळावर विश्वास आहे. कोणावरही रोष नाही. सरकारनं आंदोलन मोडते का बघितले पण आम्ही ते मोडू दिले नाही. आमचं रक्त सांडलं आहे, आता आम्ही मागे हटणार नाहीत असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एबीपी माझाच्या झिरो अवर या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आंदोलनाच्या संदर्भात विविध मुद्दे मांडले. समाजाचं काम करत असताना झोकून देऊन काम करायचे असते. मी घेतलेल्या ध्येयापासून माघार घेणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आरक्षणासंदर्भात जो निर्णय होईल तो सर्वसामान्य मराठ्यांसाठी होणार आहे. आरक्षण मिळत असेल तर कोणी आडकाठी घालू नये असे जरांगे पाटील म्हणाले.
आंदोलन पैशासाठी नाही तर न्यायासाठी
लोक ज्यावेळी आमच्या आंदोलनावर चुकीच्या प्रतिक्रिया देतात, त्यावेळी वाईट वाटते असेही जरांगे पाटील म्हणाले. आम्ही फक्त 22 गावांचे पैसे वापरले आणखी 101 गावांचे पैसे शिल्लक आहे. आम्ही ते वापरले नाहीत. आम्हाला जर पैसाच कमवायचा अलता तर, ते पैसे घेतले असते. आमचे आदोलन हे पैशासाठी नाही तर न्यायासाठी आहे. 21 लाखांमध्ये आमचा कार्यक्रम पार पडल्याचे जरांगे पाटील म्हणाले.