मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) पक्ष फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या विचाराने जाणार असल्याचे म्हटले होते. आता, शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाकडून यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा दाखला देत अजित पवार गटाकडून कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मरेपर्यंत भाजप (BJP) सोबत जायचं नाही अशी ताकीद केली होती. त्यामुळे सद्य परिस्थितीत सगळे गेले तरी कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत जायचं नाही अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकसभा मतदारसंघ निहाय बैठक सुरू आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांसमोर भाषण केले. सातारा लोकसभा निवडणुकीबाबत आढावा घेताना शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार सांगणारे भाषण केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शरद पवार यांनी अजित पवार गटाकडून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो बॅनरवर लावण्याच्या कृतीवरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, अजित पवार गटाने माझ्याऐवजी आता यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो वापरायला सुरुवात केली आहे. चव्हाणसाहेब विचार करत असतील की, भाजपाच्या विचारांसोबत माझा फोटो कसा काय लावला?
शरद पवार यांनी म्हटले की, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मरेपर्यंत भाजप सोबत जायचं नाही अशी ताकीद केली होती. त्यामुळं सद्य परिस्थितीत सगळे गेले तरी कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत जायचं नाही. सध्या अजित पवार यांच्यासोबत केवळ ईडी सीबीआयच्या भीतीने जाणारे लोक असल्याचेही पवार यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणूक ताकदीने लढण्याचा कार्यकर्त्यांसमोर निर्धारही शरद पवार यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी काही महिने राहिले असताना पवार यांनी पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेत मतदारसंघनिहाय आढावा घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, अशोक पवार, माजी आमदार कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील दोन्ही जागांवर शरद पवार गटाचाही दावा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर (Kolhapur Loksabha) शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून (Congress) दावा करण्यात आला असतानाच आता शरद पवार गटाकडूनही (Sharad Pawar) दावा करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद पवारांकडे एकमुखाने मागणी पदाधिकऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी बैठकीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली असून मविआच्या जागावाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी केली.