औरंगाबाद: गेल्या पंधरा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती सतत सरकारकडून सुरू आहे. असे असतानाच ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 16 सप्टेंबरला औरंगाबादमध्ये मराठवाडा विभागाची कॅबिनेट बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीपूर्वी जरांगे पाटील यांना गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राऊत म्हणाले आहे.


काय म्हणाले संजय राऊत? 


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, "माझ्या हातात सत्ता द्या 24 तासांत पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांची ही फुलबाजी आता विझली आहे का?,त्या आश्वासन आणि वचनांचे काय झालं आहे. जरांगे पाटील यांनी जे समाजासाठी प्राण पणाला लावले आहेत, त्यांच्यावर सरकार दबाव आणत आहे. 16 सप्टेंबरला औरंगाबादमध्ये मराठवाड्याची कॅबिनेट बैठक होणार आहे. त्यासाठी मी स्वतः जाणार आहे. तर, याच कॅबिनेटच्या बैठकीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यामुळे जरांगे पाटील यांना गुंडाळण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण जरांगे हा तरुण नेता गुंडाळण्यातील नाही. 


फडणवीसांवर टीका...


राज्यातील वातावरण कधी नव्हे एवढ अस्थिर, असुरक्षित, जातीपातीमध्ये फाटलेला आहे. या सर्वाला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे. ज्या दिवसांपासून फडणवीस हे राज्याचे मुख्यंमत्री झाले, त्या दिवसांपासून महाराष्ट्रातील जातीपाती फाटला गेला. आम्ही अनेक मोठ्या नेत्यांचं नेतृत्व पाहिले आहे. हा महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या एकसंघ असला पाहिजे. यासाठी या सर्व नेत्यांचां कौशल्य होतं. मात्र, गेल्या 10 वर्षात हा महाराष्ट्र फाटला असून, जाती आणि धर्मानुसार तुकडे पडत असल्याचं राऊत म्हणाले. 


मुख्यंमत्री शिंदे यांच्यावर टीका? 


राऊतांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, काही गंभीर आरोपही केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटलांना सरकार मारू इच्छिते, सरकारला त्यांची कुठलीही चिंता नाही, असं म्हणत संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या उत्तरावरुनही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते बंगले कुणाचे हे माहीत नाही, पण त्यांची चावी अजय आशर या बिल्डरकडे आहे का? हे मुख्यमंत्र्यांना विचारा, असं म्हणत संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


सरकार मनोज जरांगे पाटलांना मारू इच्छिते, सरकारला त्यांची कुठलीही चिंता नाही; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात