Manoj Jarange patil : मराठा आरक्षण मुद्दा अडगळीत पडल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला दिशा देऊन निर्णायक टप्प्यावर घेऊन गेलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्णायक रणशिंग फुंकले आहे. त्यांनी 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून पदयात्रा सुरू केली आहे. ती आता पुण्यामध्ये येऊन पोहोचली आहे. पुण्यामध्ये सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. इतकेच नव्हे तर आज पहाटे पाच वाजता महाराज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. यावेळी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ही लक्षणीय होती. यानंतर आता मुंबईच्या दिशेने पदयात्रेचा प्रवास सुरू झाला आहे. पुण्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला न भूतो न भविष्यती असाच पाठिंबा मिळाला.
2011 मधील फोटो व्हायरल
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा एक जुना फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून ते गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत असल्याचे स्पष्ट होते. 2011 मध्ये त्यांनी शहागड पोलीस चौकीमध्ये निवेदन दिल्याचा फोटो एक व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको करून शहागड येथील पोलीस चौकीमध्ये 2011 मध्येच मराठा आरक्षणासाठी निवेदन दिले होते.
सरकारला अक्षरशः कोंडीत पकडलं
त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आताच आंदोलनामध्ये आले आहेत असं म्हणणं अतिशयोक्तीपणाचे ठरेल, असंच सांगणारा हा फोटो आहे. इतकच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून सरकारला त्यांनी अक्षरशः कोंडीत पकडलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरती कधी नव्हे ती चर्चा सुरू झाली आहे. अवघ्या मराठा समाजातील प्रत्येक घरातील प्रत्येकाच्या तोंडीही नाव जाऊन पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडला आहे.
छोट्या- मोठ्या आंदोलनात सहभागी
मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातून सुरू केलेला प्रवास आज केंद्रस्थानी आला आहे.मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव असूनह शहागड ही त्यांची सासुरवाडी आहे. मराठा आंदोलने सुरू झाली तेव्हापासून छोट्या- मोठ्या आंदोलनात सहभागी होणारे, प्रसंगी पुढारपण करता आले तर एखादे भाषण करणाऱ्या जरांगे यांच्या मागे पाठबळ उभे राहील, अशी शक्यता आंतरवलीच्या आंदोलनापूर्वी नव्हती. गावागावात आंदोलन करण्यासाठी बारावीपर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली आहेत. अनेक गावात उपोषणही केलं आहे.
मराठवाड्यातील दुष्काळसदृष्य परिस्थितीमध्येही या आंदोलनेचे कारण दडलेले आहे. कापूस, सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. शिकलेली मुले शहरात स्पर्धा परीक्षेत गुंतले आहेत किंवा गावातच शेतीमध्येही प्रयोग करुन पाहत आहेत. पण या प्रयत्नांना प्रतिष्ठाही मिळत नाही. त्यामुळे गावोगावी विवाह न झालेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. या सर्व मुलांना आपले प्रश्न फक्त आरक्षणाच्या माध्यमातूनच सुटू शकतात हे खोलवर रुजले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला होणारी गर्दी यातून जमा होते.
मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा ही संघटनाही स्थापन केली आहे. जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. त्यांच्यातील समाजसेवेतील आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मराठा आरक्षणासाठी आर्थिक रसद मिळावी म्हणून त्यांनी स्वतःच्या मालकीची जमिनही विकली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या