मुंबई: मराठ्यांना 100 टक्के मोफत शिक्षण, आरक्षण (Maratha Reservation Protest) मिळेपर्यंत सरकारी भरतीमध्ये मराठ्यांच्या जागा रिक्त सोडा आणि सगेसोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या अशा मागण्या मनोज जरागे (Manoj Jarange) यांनी केल्या आणि त्यासंबंधी उद्या सकाळपर्यंत सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी आपण आज आझाद मैदानाकडे जाणार नसून वाशीमध्येत राहू, पण जर अध्यादेश काढला नाही तर मात्र आझाद मैदानाकडे जाणारच असा इशारा जरांगे यांनी दिला.


राज्यभरात एकूण 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यापैकी 37 लाख लोकांना कुणबी सर्टिफिकेट दिल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलंय. त्यामध्ये राज्य सरकारने सगेसोयऱ्यांची व्याख्या काय याची माहिती दिली आहे. वडिलांच्या रक्तसंबंधातील नातेवाईक हे सगेसोयऱ्यांमध्ये येतील, त्यासाठी योग्य पुरावे सादर केल्यास त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात येईल असं राज्य सरकारने स्पष्ट केलयं. 


मनोज जरांगेंची मागणी काय? (Manoj Jarange Demand On Maratha Reservation) 


मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांच्या व्याख्यात आईकडील नातेवाईकांचाही समावेश करावा अशी मागणी केली आहे. एकाच जातीत लग्न झालं असेल तर आईकडील नातेवाईकांनाही सगेसोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये घ्या आणि त्यांनाही कुणबी सर्टिफिकेट द्या अशी मागणी जरांगे यांनी केलीय. 


महाराष्ट्र सरकारची सगेसोयऱ्यांची व्याख्या काय? 


जात ही वडिलांकडून प्राप्त होत असल्याने वडील किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील नातेवाईक यांचे नाते संबंध सिद्ध करणारे कागदोपत्री पुरावे अनिवार्य आहेत. तथापि, सजातीय विवाह किंवा अंर्तजातीय विवाह याबाबतचे पुरावे सिद्ध करणे ही समिती स्तरावरावरील अशक्यप्राय व वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे सदरचे कागदोपत्री पुरावे सिद्ध करणे व याबाबत गुणवत्तेनुसार समितीस्तरावर निर्णय घेणे यामध्ये प्राप्त प्रकरणांच्या अनुषंगाने बराच कालापव्यय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सगेसोयरे - सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्या पूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.


रक्त नात्यातील काका, पुतणे आणि भावकी


कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. 


कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम २०१२ नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीच्या आधार घेऊनच सर्व सग्या सोयऱ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात येतील.


सजातीय लग्नाच्या सोयरिक


ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करुन दिल्यास गृहचौकशी करुन त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.


कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना, जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. सदरची अधिसूचना अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.


उपलब्ध असल्यास, पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि/किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र.


मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय? 


- नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
- शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. 
- कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना 100 टक्के शिक्षण मोफत करा.
-  जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
- आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा .
- आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
- SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या .
- वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
- रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.


ही बातमी वाचा: