जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे आज (20 जानेवारी) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंतरवाली सराटीमधून (Antarwali Sarathi) निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासोबत लाखोंचा जनसमुदाय पाहायला मिळतोय. सकाळी साडेदहाच्या सुमारास  अंतरवाली सराटीपासून निघालेली पायी दिंडी दुपारनंतर गेवराई तालुक्यातील कोळगावला पोहचली. त्यानंतर आज रात्रीचा मुक्काम शिरूर तालुक्यातील जरांगे यांच्या जन्मगावी म्हणजेच मातोरीत केला जाणार आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाबाबत अनेक घडामोडी घडतांना पाहायला मिळाल्या. 


मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे ढसाढसा रडले..


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, यावेळी बोलतांना मनोज जरांगे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपली भावना व्यक्त करतांना जरांगे भर पत्रकार परिषेदत ढसाढसा रडले. मनोज जरांगे यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून उपस्थित आंदोलकांचा देखील कंठ दाटून आले. 


जरांगेंनी शेवटचा डाव टाकला...


मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनामुळे आधीच अडचणीत आलेल्या सरकरावर जरांगे यांनी आंतरवाली सराटीमधून निघण्यापूर्वी मोठा डाव टाकला. मुंबईत जाऊन आमरण उपोषण करण्यापेक्षा पायी दिंडीतच आमरण उपोषणाला सुरवात करण्याचा आमचा विचार असून, आम्ही यावर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे जरांगे म्हणाले. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांनी आमरण उपोषण करत मुंबई गाठण्याचे ठरवल्यास सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यावर जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली: बच्चू कडू


मनोज जरांगे यांच्या आंदोलनात आपण आंदोलक म्हणून सहभागी होणार असल्याची भूमिका यापूर्वीच आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार आपण आंदोलनात सहभागी होत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली, अशी प्रतिक्रिया देखील बच्चू कडू यांनी दिली आहे. 


मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न : शिरसाट 


एकीकडे मनोज जरांगे यांचे मुंबई आंदोलनाला आजपासून सुरवात झाली असतानाच दुसरीकड, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. तर, जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही? मग हा वाद का निर्माण करत आहात?, सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे. मात्र, शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे, असे शिरसाट म्हणाले आहेत. 


जरांगेंचा बालहट्टपणा...


दरम्यान, मुंबई आंदोलनावरून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे यांची भूमिका म्हणजे बालहट्ट म्हणावे लागेल. 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या असा दावा मनोज जरांगे करतात. खरंतर या पैकी 99.5 टक्के लोकांनी आधीच कुणबी प्रमाणपत्र घेतले असल्याचे तायवाडे म्हणाले आहेत.


पोलिसांच्या सुट्ट्या रद्द...


मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले असून, त्यांच्यासोबत लाखो मराठे देखील मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांच्या याच मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात देखील मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पत्र काढण्यात आले आहे. ज्यात 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सर्व पोलीस अधिकारी, अमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (वैद्यकीय रजा वगळून)  रद्द करण्यास घटक प्रमुखांना मान्यता देण्यात आली आहे. 


मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली...


मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी  बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीला सुरवात झाली आहे. ज्यात, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित आहे. तसेच, या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, आमदार बच्चू कडू, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, महसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज, इतर मागासवर्ग विभागाच्या सचिव अंशू सिन्हा , विधी व न्याय सचिव कलोते यांची उपस्थिती.  प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव ( साविस) सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना; राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द