मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange)   20 जानेवारीपासून पाटील मुंबईतल्या (Mumbai)  आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. बीडमधल्या सभेतून जरांगे पाटलांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान मनोज जरांगेंनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला नाही तर भाजप आणि टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी (Tata Mumbai Marathon)  मोठी अडचण निर्माण होऊ शकते.


एकीकडे  22 जानेवारीला राम मंदिराचा सोहळा आणि दुसरीकडे जरांगेंचं आमरण उपोषण सरकारला डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पावलं उचलेल अशीही शक्यता वर्तवली जातेय. तर टाटा मॅरेथॉनची सांगता 21 जानेवारीला आझाद मैदानात होणार आहे. त्यामुळे जरांगेंचं आमरण उपोषण टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी अडचणीचे ठरण्याची दाट शक्यता आहे.


मनोज जरांगेंचा इशारा


बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. जातीपेक्षा मोठा नेता मानू नका,आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसा, असं आवाहन त्यांनी महिलांना केलं. सरकारने दहा बारा दिवस मिळत आहेत ते बघावेत. एकदा अंतरवलीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.


मुंबईत 20 जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण


मराठा आरक्षणालाठी लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी 18 जानेवारीपर्यंत नोटिस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठ्यांना दाबू शकणार नाही. आतापर्यंत खूप झालं. आता मुंबईत 20 जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात येईल. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायचं. 


मनोज जरांगेंनी अॅक्शन प्लॅन सांगितला!


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडे कूच करतील. मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही, मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही. कुणीही जाळपोळ, तोडफोड करायची नाही. शांततेत जायचं, शांततेत यायचं. जो हिंसा करेल तो आपला नाही, हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायचं नाही.  


हे ही वाचा :


Maratha Reservation : मराठा आरक्षणावर क्युरेटीव्ह याचिका स्वीकारली, त्याचा नेमका अर्थ काय?