मुंबई : केंद्रातील एनडीए सरकारने यंदाच्या हंगामातील पहिला अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांच्या माध्यमातून संसदेत सादर केला. तरुणाईसाठी नवी योजना, पायाभूत सुविधांसाठी भरीव तरदूत, टॅक्स स्लॅबमध्ये बदल आणि स्टॅम्प ड्युटी कमी केल्याने हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा व शेतकऱ्यांसाठीचा असल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. तसेच, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, देशाला प्रगतीकडे नेणारा समृद्ध अर्थसंकल्प (Budget 2024) असल्याचंही सत्ताधारी पक्षातील नेते सांगत आहेत. महायुतीमधील प्रमुख पक्षाच्या सर्वच नेत्यांनी बजेटवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राच्या विकासांचं आणि देशाच्या गतीमानशीलतेचं हे बजेट असल्याचं म्हटलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, भारताच्या भविष्यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारा आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले. मात्र, विरोधकांकडून या बजेटमधून महाराष्ट्राला काहीच मिळालं नसल्याची टीका करण्यात येत आहे. त्यावरही, आता देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं आहे. 


अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बजेट सादर केल्यानतंर विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राला या बजेटमधून काहीच मिळालं नसल्याचं म्हटलं आहे. तर, मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसतेय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बजेटवर नाराजी व्यक्त केली. आता, केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले, याची माहितीच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 






या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी असलेल्या तरतुदींची ही प्राथमिक यादी, फेक नॅरेटीवच्या राजकरणाच्या पलीकडे जाऊन विरोधकांनी अर्थसंकल्प समजून घेण्याची गरज अधोरेखित करणारी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी एक इमेज ट्विट करुन महाराष्ट्राला काय काय मिळालं हे सांगितलं असून अजून बरेच काही मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरुनही ट्विट करत उद्धव ठाकरेंवर पलटवार करण्यात आलाय.


भाजपने ट्विट करुन दिली माहिती


ज्यांना अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही अशा उबाठांसाठी हा सोप्या भाषेतला अर्थसंकल्प, बजेटमधील महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या घोषणांची यादी, असे ट्विट भाजपने केलंय. 


सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी - 


- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
- MUTP-3 : 908 कोटी
- मुंबई मेट्रो: 1087 कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
- नागपूर मेट्रो: 683 कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
- पुणे मेट्रो: 814 कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी


बजेटवर काय म्हणाले उद्धव ठाकरे


''पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे, तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे !'', अशी संतापजनक प्रतिक्रिया उद्ध ठाकरेंनी आजच्या एनडीए सरकारने सादर केलेल्या बजेटवर दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपनेही ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. त्यामध्ये, महाराष्ट्राला या बजेटमधून नेमकं काय मिळालं, याची माहितीच भाजपने दिलीय.