मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील यंदाच्या एनडीए सरकारमधील पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज सादर केला. त्यामध्ये, युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी नवी योजना जाहीर केली आहे. तर, पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, आजच्या बजेटमधून (Budget) सर्वात महत्वाचा निर्णय ठरला तो, सोने व चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याचा. त्यामुळे, सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली असून मोबाईल (Mobile), चार्जरही स्वस्त झाले आहेत. त्यामुळे, मोबाईल खरेदी करु इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने मोबाईल चार्जरवरील कस्टम ड्युटी 20 टक्यांहून कमी करुन 15 टक्के एवढी केली आहे. त्यामुळे, आता मोबाईल फोन आणि चार्जर खरेदीवर ग्राहकांना 5 टक्के कमी रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजे, एकप्रकारे मोबाईल खरेदीवर 5 टक्क्यांची सूट भारतीय ग्राहकांना मिळणार आहे.  

Continues below advertisement


केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्याने सोन्याचे भाव तब्बल 3 ते 5 हजारांनी कमी झाले आहेत. त्यामुळे, सोनं खरदेसाठीही बाजारात आता रेलचेल पाहायला मिळू शकते. तर, मोबाइल ही माणसांची गरज बनल्याने मोबाईल खरेदीधारकांनाही दिलासा मिळाला आहे. मोबाईल व चार्जरच्या खरेदीवर 5 टक्के प्रमाणे सूट मिळणार आहे. म्हणजेच उदाहरण देऊन सांगायचं झाल्यास, जर तुम्ही 20 हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदी केला. तर, यापूर्वी 20 हजार रुपयांच्या मोबाईलवर 20 टक्के कस्टम ड्युटी लावली जात होती. याचा अर्थ 20 हजार रुपयांच्या फोनवर 4 हजार रुपये ड्युटी चार्च ग्राहकांना द्यावा लागत होता. त्यामुळे, 20 हजारांचा फोन तुम्हाला 24,000 रुपयांना विकत घ्यावा लागत होता. 


दरम्यान, आता सरकारने 5 टक्के कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे 20 हजार रुपयांच्या मोबाईल खरेदीवर तुम्हाला 5 टक्के सवलत मिळणार आहे. म्हणजेच, 20 हजार रुपये किमतीच्या मोबाईलवर आता 15 टक्केच कस्टम ड्युटी द्यावी लागेल. याचा अर्थ, 3000 रुपये कस्टम ड्युटी म्हणजेच 23 हजार रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे, 20 हजार रुपयांच्या स्मार्टफोन खरेदीवर तुमचे 1000 रुपये बचत होतील. तर, तुम्ही 10 हजार रुपयांचा मोबाईल खरेदी कराल, तर तुम्हाला 500 रुपयांचा लाभ होणार आहे. 


चार्जरवरही 5 टक्क्यांची बचत


मोबाईल फोनसह चार्जरच्या किंमतीतही 5 टक्के बचत होणार आहे. उदाहरणासाठी एखाद्या चार्जरची किंमत 1000 रुपये असल्यास त्याची कस्टम ड्युटी 15 टक्के म्हणजेच तो चार्जर तुम्हाला 1150 रुपयांना मिळेल. तुम्हाला 150 रुपये अधिक द्यावे लागतील, जे पूर्वी तुम्हाला 200 रुपये अधिक द्यावे लागले असते. म्हणजे, 1 हजार रुपयांमागे तुमचे 50 रुपये बचत होतील.


हेही वाचा


Video: 'सुवर्ण'संधी... सोने मुंबईत 5 हजार, पुणे, जळगावात 3 हजाराने स्वस्त, तुमच्या शहरातील दर किती?