मुंबई : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) मुंबईतील आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय. प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली. मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू यांनी उपोषणस्थळावर चर्चा केली. आजच्या भेटीनंतर ही मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याच त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढला असून जरांगे आणि बच्चू कडू यांच्या चर्चेतून काय साध्य झालं हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.
आज सकाळी अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेल्या बच्चू कडूचा आजचा दौरा अनपेक्षित नसला तरी सरकार दरबारी अजूनही दखलपात्र आहे हे जाणवून देणारा होता. सकाळी सव्वा सात वाजता बच्चू कडू अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आणि आठ वाजल्यापासूनच मनोज जरांगे आणि बच्चू कडूमध्ये चर्चा सुरू झाली. कुणबी नोंद मिळालेल्या रक्त संबंधातील नातेवाईकांच्या सग्या सोयऱ्यांना शपथपत्र भरून पुरावा उपलब्ध करून दिल्यास त्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळावे. नोंदी मिळालेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी जरांगे यांच्याकडून करण्यात आली. सव्वा तासाच्या चर्चेनंतर जरांगे यांच्या मागण्या आणि त्यातील दुरुस्ती कागदावर नोंदवून बच्चू कडू यांनी सरकारकडे हे सादर करण्याच आश्वासन दिलं. त्यावर जरांगे यांनी चर्चेचे गुऱ्हाळ 7 महिन्यापासून सुरू असल्याचे उत्तर दिलं.
बच्चू कडू आणि जरांगेच्या चर्चेनंतर मूळ प्रश्न कायम
बच्चू कडू यांनी भेटीच्या सुरुवातीलाच आपण मध्यस्थ आणि आंदोलक या दुहेरी भूमिकेत आल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय आपण वीस तारखेला आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केलं. त्यामुळे बच्चू कडूंच्या चर्चेतून समस्या सुटणार नाही हे स्पष्ट होतं. मग यातून काय मार्ग निघणार होता हा प्रश्न उपस्थित होतोय. दोघांच्या या तपशीलवार चर्चेनंतर मूळ प्रश्न कायमच असून या चर्चेमुळे जरांगेंचा समाधान हा एवढा एकच उद्देश होता का असा सवाल उपस्थित होत आहे.
मंगेश चिवटे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय
जरांगे यांनी आजवर लावून धरलेली मागणी, सरसकटला पर्याय म्हणून सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही जुनीच मागणी कायम असताना, त्याबाबत सरकारकडे कुठलाही ठाम उपाय नसून देखील बच्चू कडू या चर्चेतून काय नवीन मार्ग काढणार होते? या चर्चेला सरकारचे इतर प्रतिनिधी का नव्हते? सुरुवातीपासून सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंगेश चिवटे यांची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय होता. या प्रश्नामुळे बच्चू कडू यांची भूमिका सरकारचे प्रतिनिधी म्हणून होती की. सरकार वरती स्वतःचा दबाव निर्माण करन्यासाठी होती?असा सवाल उपस्थित होत आहे.
महायुतीत सर्वच काही आलबेल नाही
महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार गटामुळे सहकारी पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. गेल्या काही दिवसात बच्चू कडू यांचे स्टेटमेंट देखील महायुतीत सर्वच काही आलबेल नाही हेच दाखवत आहेत. त्यामुळे स्वअस्तित्व दाखवण्यासाठी हा दबाव निर्माण करण्याचे हे चर्चेचे परिश्रम घेतले गेले का ? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा :