मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असून, राज्यात विविध भागात रोज वाढलेली असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते नेते सचिन सावंत यांनी केला आहे.


सद्य स्थितीत नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी असल्याचं सचिन सावंत म्हणाले.

- या वर्षी राज्यात जवळपास 74.4 टक्के पाऊस पडला आहे. पाणीपुवठा विभागाच्या आकडेवारीनुसार 17 नोव्हेंबर 2018 पर्यंत राज्यात एकूण 715  टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

- 2014  साली राज्यात 70.2 टक्के म्हणजे या वर्षीपेक्षा कमी पाऊस पडला होता. त्यावेळी 17 नोव्हेंबर 2014 च्या आकडेवारीनुसार राज्यात केवळ 71 टँकर सुरु होते.

- तर 2015 साली राज्यात त्याहीपेक्षा कमी म्हणजेच 59.4 टक्के पाऊस पडला होता. 16 नोव्हेंबर 2015 च्या आकडेवारीनुसार त्यावेळी 693 टँकर राज्यात सुरु होते.



यातूनच जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत आहे. या योजनेवर खर्च झालेले 7 हजार 789 कोटी रुपये हे जलयुक्त शिवारच्या खड्ड्यांमध्ये मुरले का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

या योजनेवर हजारो कोटी खर्च करुनही राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासही सरकार सक्षम नसेल, तर याची न्यायालयीन चौकशी करावी. तसंच जलसंपदा मंत्र्यांनी या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.