Manjra Dam: बीड जिल्ह्यातील केज अंबाजोगाई धारूर आणि लातूर शहरासह अन्य छोट्या मोठ्या गावांचा पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण यंदा भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरण 80% पेक्षा अधिक भरलं असून दोन वर्षांनंतर या धरणातून सिंचनालाही पाणी मिळणार आहे. 15 ऑक्टोबर च्या पाण्यासाठी वर कालवा समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. 


लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील तब्बल 1823 हेक्टर शेतीला या धरणातून यंदा पाणी मिळणार आहे. मागच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस  पडल्याने हे धरण भरलं नव्हतं. 


शेतकऱ्यांना दिलासा मिळणार 


2020 -21 व 22 मध्ये मांजरा धरण भरले होते. परिणामी प्रकल्पाचे उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे सलग तीन वर्ष शेतीला पाणी मिळालं होतं. मागील वर्षी मांजरा धरण प्रकल्प न भरल्याने शेतीला पाणी मिळाले नाही. पण यंदा 80 टक्के होऊन अधिक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. केज तालुक्यातील मांजरा धरण हे बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्याच्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरले आहे. या महत्वपूर्ण धरणाची वाटचाल पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने सुरू आहे. यामुळे शेती, पिण्याचे पाणी व औद्योगिक वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. मागील काही दिवसांपासून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे


रब्बीसाठी पाणी सोडणार की उन्हाळी पिकांसाठी? 


रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची मागणी आली तर उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होऊ शकतो. मात्र मागणी आली नाही तर उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल त्यामुळे तीन जिल्ह्यातील 18223 हेक्टर शेतीवरील पिकांना पाणी मिळणार असून बीडसह लातूरधाराशिव जिल्ह्यातील शेतीलाही मांजरातून कृषी सिंचन होणार आहे.


किती भरलंय मांजरा धरणं?


जलसंपदा विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मांजरा धरणात १३९.१० दलघमी पाणीसाठा शिल्लक असून ८०.२६ टक्के धरण भरले आहे. मागील वर्षी अवघ्या २४.४८ टक्क्यांनी हे धरण भरलं होतं. यंदा चांगला पाऊस झाल्यानं मांजरा धरणामध्ये चांगली पाण्याची आवक झाली आहे.


माजलगाव धरणातही पाण्याची चांगली आवक


मागील वर्षापासून शुन्यावर व महिनाभरापूर्वी मृतसाठ्यात असणारं माजलगाव धरण ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानं एका दिवसात १८ टक्क्यांवार गेले होते. आता माजलगाव धरणात  ४४.६८ टक्के पाणीसाठा झाला असून बीड शहरातील शेतकऱ्यांच्या पिकांसह नागरिकांची तहान भागणार आहे. मागील वर्षी माजलगाव धरण याच सुमारास १२.२१ टक्क्यांवर होते. यंदा पाऊस चांगला झाल्यानं बीडकरांची चिंता मिटली आहे.