पुणे : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील बुडालेल्या चारही डॉक्टरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले.


सुभाष मांजरेकर, महेश लवटे, चंद्रकांत उराडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे अशी मृतदेह सापडलेल्या डॉक्टरांची नावं आहेत.

इंदापूर तालुक्यातील अजोती या गावात रविवारी सुट्टीनिमित्त डॉक्टरांचा एक ग्रुप आला होता. त्यावेळी उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जलविहार करताना दहा डॉक्टर असलेली बोट उलटली होती. त्यावेळी चारजण बुडाले होते. तर उर्वरित सहा जण पोहून बाहेर निघाले.

आज सकाळी स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांच्या सहाय्याने आठ बोटींच्या मदतीने शोधमोहीम सुरु झाली. तहसिलदार , पोलिस निरिक्षक, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत शोध मोहीम सुरु झाली.

धरणात दीड ते दोन हजार मीटर लांबीवर बुडल्याची भीती व्यक्त केल्याने या मृतदेहांना बाहेर काढणे खूप कठीण होते. मात्र शोधमोहीम सुरु झाल्यानंतर काही तासातच पहिल्यांदा डॉ.सुभाष मांजरेकर (अकलूज) आणि डॉ.महेश लवटे (नातेपूते) यांचा मृतदेह काढण्यात यश आले. पण डॉ.अण्णासाहेब शिंदे याचा शोध काही लागत नव्हता.

अखेर पुरंदर येथील शिवतारे या खाजगी टीमने या ठिकाणी येऊन चौथ्या डॉक्टरांचा मृतदेह बाहेर काढला.

या घटनेत हे सर्व डॉक्टर कसे काय बुडाले याबबत कुणलाच खरी माहिती समजू शकली नाही. फिर्यादीत सुध्दा बोट उलटून बुडालो असा उल्लेख आहे. मात्र बुडाल्याबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहे.

ज्या बोटीने सर्व डॉक्टरांनी जलविहार केला आणि जी बोट बुडाली तीचे नाव  " आठवण" असे आहे . त्यामुळे या बोटीची आठवण कोणीही विसरू शकत नाही.

उजनीच्या पात्रामध्ये मच्छिमारांसोबत बोट घेऊन नौका विहार करणं कायदेशीर नसताना बोटिंगसाठी ते का उतरले? बोट बुडण्याचं नक्की कारण काय? आणि या उमद्या डॉक्टरांच्या मृत्यूला जबाबदार कोण? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळायची बाकी आहेत..

संबंधित बातम्या
इंदापुरात सुट्टीनिमित्त फिरायला आलेले चार डॉक्टर बुडाले