Cyber Scams Thane : डिजिटल व्यवहारांनी पैश्यांची देवाणघेवाण सोप्पी केली, त्याच बरोबर हा मार्ग अतिशय सुरक्षित असल्याचे देखील सांगितले गेले. पण आता डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये देखील फसवेगिरी करून चोरी करण्याचे वेगवेगळे प्रकार शोधले गेले आहेत. असाच एक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. फोन पे या सुप्रसिद्ध डिजिटल ट्रांजेक्शन करणाऱ्या ॲपद्वारे देशभरातील 14 ज्वेलरी शॉपसह 32 हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या एका उच्चशिक्षित आरोपीला वर्तकनगर पोलिसांनी अटक केल्ली आहे. त्याचे नाव सुब्रमण्यम रामकृष्ण अय्यर असून तो 33 वर्षाचा आहे. त्याने एम बी एचे शिक्षण पूर्ण केले आहे तर आय टी मध्ये देखील शिक्षण घेतले आहे. इतका उच्चशिक्षित असूनही आपल्या बुद्धीचा चुकीचा वापर करून फसवणूक केल्याने त्याला आज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


काही दिवसांपूर्वी एका ज्वेलर्स मालकाने वर्तक नगर पोलीस स्टेशनमध्ये आपली 97 हजार रुपयांना फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केला होती. विशेष म्हणजे फोन पे या डिजिटल ऍपच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याने पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आणि सुब्रमण्यमला अटक केली. तो पैसे देण्यासाठी फोन पे ऍप वापरल्याचे दाखवायचा. त्यासाठी मुद्दाम पैसे नसलेले बँक अकाउंट त्याने एका फोन पे खात्याला जोडून ठेवले होते. त्यामुळे क्यू आर कोड स्कॅन करून पैसे देताना ट्रांजेक्शन फेल असे यायचे हे तो दुकानदारांना दाखवायचा मात्र दुसऱ्या क्षणी त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेवायचा हा स्क्रीन शॉट तो पिकासा नावाच्या ॲप मध्ये घ्यायचा त्याला ताबडतोब एडिट करून हवी ती रक्कम त्यात टाकून पुन्हा एडिट केलेला स्क्रीन शॉट दुकानदारांना दाखवायचा तसेच ज्यांना विश्वास बसत नसेल त्यांच्यासाठी सेजदा वेबसाईट वरून ऑनलाइन पीडीएफ एडिटर वापरून बँक स्टेटमेंट देखील एडिट करायचा आणि पुरावा म्हणून समोरच्या व्यक्तीला दाखवायचा. असे करून त्याने 14 ज्वेलरी शॉप आणि 32 हॉटेल चालकांना तब्बल 20 लाख रुपयांना गंडावले असल्याचे तपासात पुढे आले आहे. 


सुब्रम्हण्यम उच्चशिक्षित असून त्याने एमबीए आणि आयटी चे शिक्षण घेतलेले आहे. मात्र तो बेरोजगार होता. त्याचे घर आईच्या पेन्शनवर चालत होते. मात्र आईचे निधन झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी सुब्रम्हण्यम हा कुठलेही काम करत नसल्याने त्याला घराबाहेर काढले होते. उदरनिर्वाह कसा करायचा आणि मौज मज्जा करण्यासाठी त्याने मोबाईल अॅपचा वापर करून ऑनलाईन पेमेंटद्वारे हॉटेल आणि ज्वेलर्स व्यवसायिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. मोठी ज्वेलर्सची दुकाने आणि मोठ्या हॉटेल्समध्ये ऑनलाईन पेमेंटचे ट्रांजेक्शन झालेले मेसेज हे उशिरा येतात याचाच फायदा सुब्रमण्यमने घेतला. त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी केले आहे.