अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी चारा छावण्यांबाबत शेतकऱ्यांना संतापजनक सल्ला दिला आहे. "चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा," असं उत्तर राम शिंदे यांनी दिलं आहे.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या स्वागतासाठी बुधवारी दुपारी 1 वाजता पालकमंत्री पाथर्डी इथल्या विश्रामगृहावर बुधवारी आले होते, यावेळी हा प्रकार घडला. पालकमंत्र्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून शिंदे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त होत आहे.
पाथर्डी पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावांसाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या छावण्या आणि रोजगार हमीची कामं सुरु करण्यात यावीत, या मागणीसाठी नगरसेवक रमेश गोरे यांनी आमदार मोनिका राजळे आणि पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन दिलं. विशेष म्हणजे यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी तुमची जनावरं पाहुण्याकडे नेऊन सोडा, असं सांगताच उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.
तांत्रिक अडचणी असल्या तरी पालकमंत्रांचा सल्ला संतापजनक असल्याची भावना आता व्यक्त होत आहे. तालुक्यातील जनता भयाण दुष्काळाच्या झळा सोसत असताना पालकमंत्री आणि नगरसेवक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विनोद करताना दिसून आले.