दारु पिऊन लटकत प्रवास, चालत्या ट्रेनमधून तरुण पडला
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2018 10:26 AM (IST)
26 वर्षीय तरुणाने नांदेड-बंगळुरु एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते न जमल्यामुळे तो खिडकीचं ग्रिल धरुन लटकत होता.
नांदेड : दारु पिऊन ट्रेनला लटकत प्रवास करणारा तरुण खाली पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नांदेड-बंगळुरु एक्स्प्रेसमधून तरुण पडला असून लातूर रोड आणि परळी दरम्यान ही घटना घडली. यामध्ये युवक जखमी झाला आहे. जखमी झालेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव प्रकाश करात असून तो हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. दारु पिऊन प्रकाशने नांदेड-बंगळुरु एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते न जमल्यामुळे तो खिडकीचं ग्रिल धरुन लटकत होता. ट्रेन सुटल्यानंतर काही वेळ तो लटकत राहिला. यावेळी ट्रेनमधील प्रवाशांनी त्याचा व्हिडिओही शूट केला. काही वेळानंतर प्रकाशची ग्रिलवरील पकड सुटली आणि तो खाली पडला. रेल्वे अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्याला अंबाजोगाईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चेन खेचून ट्रेन थांबवण्याऐवजी प्रवासी व्हिडिओ शूटिंग करत राहिले. यानिमित्ताने बघ्यांची मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे.