पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस राखीव मतदारसंघाचे आमदार हनुमंत डोळस (वय 58 वर्ष) यांचं आतड्याच्या कर्करोगाने निधन झालं. मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


माळशिरस तालुक्यातील दसुर हे डोळस यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कांचन, मुलगा संकल्प, मुलगी सिद्धी, चार बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.

हनुमंत डोळस यांना आतड्याचा कर्करोग होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या तीन दिवसापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज दुपारी उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.



हनुमंत डोळस यांचा अल्पपरिचय

हनुमंत जगन्नाथ डोळस लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचं निधन झालं. हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतही, त्यांनी पंढरपूर इथल्या वसतिगृहात राहून बारावीपर्यंत शिक्षण घेतलं.

2009 आणि 2014 या दोन विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढून जिंकल्या

माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यावर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या जागी 2009 मध्ये डोळस यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली.

यानंतर 2014 मध्येही डोळस इथून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. यापूर्वी डोळस यांनी चर्मकार महामंडळ आणि म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काही वर्षे काम केलं होतं.

विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या हनुमंत डोळस यांच्या अकाली निधनाने मोहिते गटाला मोठा धक्का बसला आहे.