यवतमाळ :​ यवतमाळमधील मारेगावजवळ देवदर्शनावरुन परत येताना ट्रक आणि क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात नववधूसह तिघींचा मृत्यू झाला आहे. तर नवरा (देवा उपरे) याच्यासह सात जण जखमी आहेत. गाडीतील सर्व हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी आहेत.

साक्षी देवा उपरे (वय 19 वर्ष) असं नववधूचं नाव आहे. तर लक्ष्मी उपरे (सासू, वय 50 वर्ष), सानिका भोपाळे (वय 14 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.

मारेगावजवळ मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर इथल्या महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत येत असताना, मारेगावपासून एक किमी अंतरावर अक्षरा रेस्टॉरंटजवळ हा अपघात झाला.

VIDEO | देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात, नववधूसह तिघांची मृत्यू | यवतमाळ | एबीपी माझा



हे नवदाम्पत्य लग्नानंतर चंद्रपूरच्या महांकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास करत असताना मारेगाव इथल्या अक्षरा रेस्टॉरंटजवळ, यवतमाळहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने क्रुझर गाडीला जोरदार धडक दिली. यात क्रुझर गाडी रोडवरुन तीन पलटी खात रस्त्याच्या बाजून गेली.

हा अपघात इतका भीषण होता की यात दोघींचा जागीच मृत्यू झाला तर एकीची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारांसाठी नागपूरला रवाना करण्यात आलं आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करत आहे.