नवी दिल्ली : 2019 च्या निवडणुकांना सामोरं जाण्याआधी काँग्रेसने अखेर महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. मोहन प्रकाश यांच्याऐवजी आता लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणुकीच्या वर्षातच हा महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचा प्रभार मोहन प्रकाश यांच्याकडेच होता. ए के अँन्टोनी हे प्रभारी असताना मोहन प्रकाश सहप्रभारी होते, त्यानंतर त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात आली होती. जवळपास नऊ वर्षे मोहन प्रकाश हे प्रभारी म्हणून काम करत होते.
काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी संघटनेत अनेक बदल करायला सुरुवात केली आहे. अनेक राज्यात तरुण चेहऱ्यांना प्रभारी, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मात्र 75 वर्षांच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अनुभवाला प्राधान्य देण्यात आलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्राजवळच्या कर्नाटकमधले आहेत, मराठीची उत्तम जाण त्यांना आहे. शिवाय महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्री आणि काही मातब्बर नेत्यांची गर्दी आहे. त्यामुळे या सगळ्यांना हाताळू शकेल असा अनुभवी चेहरा पक्षाला होता, त्यामुळे ज्येष्ठ नेत्यालाच ही संधी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोनल पटेल (गुजरात), आशिष दुआ (हरियाणा) आणि संपथ कुमार (तेलंगणा) यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी बदलल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही बदलले जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.