मुंबई: मालेगाव खटल्यासंदर्भात (Malegaon Blast Trial Update) मोठी अपडेट समोर येत असून कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी दबाव होता अशी कबुली आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Lt Col Prasad Purohit) यांनी एनआयए कोर्टात दिली. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करण्यासाठी दबाव आणला गेला असा खळबळजनक दावाही पुरोहित यांनी केला. 


एटीएसकडून राजकीय दबावापोटी खोटी केस दाखल


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात पुरोहित यांचा 23 पानी लेखी जबाब सादर करण्य़ात आला. एटीएसनं राजकीय दबावापोटी खोटी केस दाखल केल्याचा पुरोहितांनी आरोप केला. याशिवाय दाऊद इब्राहिम आणि कम्युनिस्टवादी नेता डॉ. गणपती या दोघांची भेट झाली होती. या भेटीतून महाराष्ट्रातील नक्षली कारवायांची माहिती आपण भारतीय लष्कराला दिली होती असा दावा पुरोहितांनी केला. 


नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा झाल्याची माहिती दिली


नेपाळमधून शस्त्र, ड्रग्ज यांचा पुरवठा बंद झाल्यानंतर दंडाकारण्यातून नक्षलवाद्यांना पुरवठा झाल्याची माहिती आपण देत होतो असा दावा कर्नल पुरोहितांनी केला. तसंच 2006-07 मध्ये डॉ. झकीर नाईकने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून बनावट नोटा वितरित करण्यात येत होत्या आणि आयएसआयकडून दहशतवादी कृत्यांना पाठबळ दिलं जात असल्याचा अहवाल दिला होता असा दावाही पुरोहित यांनी केला. 


मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सुधाकर द्विवेदीविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टानं नुकतंच या प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांच्याविरोधातही जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. साध्वी प्रज्ञा या मालेगावर बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला न्यायालयात गैरहजर होत्या. त्यामुळे NIA न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना वॉरंट बजावलं आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


मालेगावमधील एका मशिदीच्या आवारात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता.  यात अनेक जण जखमीदेखील झाले होते. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी आणि अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) या प्रकरणाचा तपास करत होतं. मात्र नंतर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.


ही बातमी वाचा: