सांगली : नागासोबत जीवघेणे व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या सांगली वन विभागाने आवळल्या. वाळवा तालुक्यातील मौजे बावचीमधील प्रदीप अशोक अडसुळे (वय 22 वर्षे) असं या तरुणाचं नाव आहे. नागाला पकडून त्याच्यासोबत अनेक व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर तो व्हायरल करत होता. या प्रकरणी वन विभागाने वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत प्रदीप अशोक अडसुळेवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपासासाठी तरुणाला वन विभागाने सोमवारी (28 मार्च) ताब्यात घेतलं आहे.


खरंतर नाग पाहिला तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. पण सांगलीतील प्रदीप अडसुळे मात्र नागासोबत जीवघेणे स्टंट करत होता. एवढ्यावरच तो थांबायचा नाही, तर याचे व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा. त्यांच्या व्हिडीओंना मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंट्सची संख्या देखील मोठी होती. नागासोबत त्याचे जीवघेणे धाडस अन् प्रताप सोशल मीडियावर अनेकांनी पाहिले असतील. त्यामुळे त्याला हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी आणखी उत्साह येत होता. 


Viral Video : तीन कोब्रांबरोबर एकत्र स्टंट करणं पडलं चांगलंच महागात, पुढे काय झालं... तुम्हीच पाहा हा व्हिडीओ


परंतु ही बाब सांगलीच्या विनविभागाच्या निदर्शनास आली. या प्रकरणी वन विभागाने वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत प्रदीप अशोक अडसुळेवर गुन्ह्याची नोंद करुन त्याला ताब्यात घेतलं. ही कारवाई सांगलीच्या वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, साहाय्यक वनसंरक्षक डॉ अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळ्याचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव, इस्लामपूरचे वनपाल सुरेश चरापले, बावचीचे वनरक्षक अमोल साठे, निवास उगले आणि भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.


फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवघेणे स्टंट?
सध्याच्या तरुणाईमध्ये स्टंटची क्रेज वाढलेली दिसले. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओंमध्ये धोकादायक स्टंट पाहायला मिळतात. अनेकवेळा हे व्हिडीओ फॉलोअर्स वाढवण्यासाठी देखील केले जातात. यामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. शिवाय संबंधित जनावरालाही हानी होऊ शकते. दरम्यान सापासोबत अशाप्रकारचे स्टंट करताना ते जीवावर बेतण्याची शक्यता सर्वाधिक असते. स्टंट करताना विषारी साप चावून अनेकदा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.