मुंबई : राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि बोर्डांच्या शाळेत मराठी विषय अनिवार्य करण्याचा कायदा येत्या अधिवेशनात करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडली आहे. त्यासंबधी देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रदेखील लिहिले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेत लक्ष्मीकांत देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी प्रा. हरी नरके, माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले की, इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करावा. देशमुख यांनी सांगितले की, देशातील 6 राज्यांमध्ये ( तामिळनाडू,आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि गुजरात) शालेय शिक्षणात तिथल्या स्थानिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आपल्या राज्यात इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करुन इयत्ता पहिली ते दहावी मराठी शिकवावी. प्रा. नरके म्हणाले की, अशा प्रकारचा कायदा करण्यात किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात कोणताही अडथळा येणार नाही.