बेळगाव : पोलिसांची परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा यशस्वी करुन मराठी बाण्याचं दर्शन घडवलं. हजारोंच्या संख्येने महामेळाव्याला उपस्थित राहून मराठी जनतेने महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली.


कर्नाटक पोलिसांनी महामेळाव्याला परवानगी नाकारली होती. मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीवर मात करुन मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने महामेळाव्याला उपस्थित राहिले.

महामेळाव्याला परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी रस्त्यावरच व्यासपीठ आणि मंडप उभारणी करून आपली जिद्द आणि लढाऊ बाण्याचे दर्शन घडवले.

आमदार जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार संध्यादेवी कुप्पेकर यांनी देखील बंदीहुकूम असताना देखील गनिमी काव्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून महामेळाव्यात भाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगावात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि प्रत्युत्तर म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा समितीतर्फे घेतला जातो.

हजारो मराठी भाषिकांनी महामेळाव्याला उपस्थिती दर्शवून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.